जेजुरी : जेजुरी शहरात देवस्थान विकास आराखडा व शहरातील विविध कामांना मी आमदार नसताना देखील न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यमान आमदारांनी शहराचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. ठराविक नगरसेवकांच्या खाबुगिरीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळत नाही, अशी स्थानिक लोकांचीच तक्रार आहे. विद्यमान आमदारांचा या सगळ्या प्रकाराला वरदहस्त आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांचे नाव न घेता केली आहे. जेजुरी (ता. पुरंदर) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 24) शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप आबा यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, शहर प्रमुख दिनेश सोनवणे, नितीन पोटे, ज्ञानेश्वर शिंदे, अजित चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. शिवतारे म्हणाले की, पुरंदर आणि हवेली तालुक्यात मी विद्यार्थ्यांना तीन लाख वह्या वितरित करणार आहे. या अभियानाला 15 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. आज जिजामाता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय, ए. सी. हुंडेकरी ज्युनिअर कॉलेज, दादा जाधवराव प्राथमिक विद्यालय येथे भेट दिली आणि विद्यार्थ्यांची संवाद साधला. शिवतारे म्हणाले की, आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताच्या विकासाचा पाया बनून आपल्या कुटुंबासह समाजाची सेवा करणार आहेत. शाळा, माता-पिता, गाव तसेच तालुक्याचे नाव उज्ज्वल करायचे कार्य ही पिढी करेल यात मला शंका नाही. उद्याचा भारत घडविण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आज या उपक्रमामध्ये विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा दिल्या. त्यांना अधिकाधिक यश संपादन व्हावे यासाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाकडे माझी प्रार्थना आहे, असेही त्यांनी नमूद केले.