पुणे जिल्हा : किरणदादा दगडे यांना विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी आपली

महिलांचा निर्धार ः घोटावडेफाटा येथे दगडे यांच्या सांगता सभेला मोठी गर्दी
पिरंगुट – आपल्या परिसराच्या विकासासाबरोबरच 60 हजार जणांची दिवाळी गोड करणारे, 20 हजार जणांना काशी, अयोध्या यात्रेसह अन्य देवदर्शन घडविणाताना आपल्या लेकराने घरच्याप्रमाणे आपली काळजी घेतली. त्यामुळे तरूणांसाठी आशेचा किरण आणि वृध्दांचा आधार असलेल्या किरण दगडे याने जशी आपल्याला काशी, अयोध्या यात्रा घडवली तशी किरणदादाला विधानसभा मिळवून द्यायची वेळ आपल्यावर आली आहे. त्यामुळे किटली समोरील बटन दाबून आपल्या लेकराला विकासासाठी निवडून देण्याचा निर्धार प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित महिलांनी केला.
मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे आयोजीत प्रचार सभेला महिलांसह तरूणांची मोठी गर्दी झाली. त्यावेळी महिलांनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच बबनराव दगडे, तानाजी दगडे, राहुल दुधाळे, गोविंद रणपिसे, तानाजी हुलावळे, प्रदीप साखरे, जीवन साखरे, शिवनाथ जांभूळकर उपस्थित होते. रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेऊन अटकेपार झेंडे रोवले. ज्या भोर, राजगड, मुळशी तालुक्यांतून महाराष्ट्र घडला. आज त्याच तालुक्यांचा विकास खुंटलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम रायरेश्वराचा कायापालट करून याठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा मानस असल्याचे सांगत किरण दगडे म्हणाले, रस्ते नाही, वाहतुक व्यवस्था नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चार ते पाच किलोमिटर चालत जावे लागत आहे.
भोर, राजगड, मुळशीत तीन कार्यालये उभारणार आणि मुलींना मोफत लग्नासाठी देणार. महिला बचत गट हे कार्यालय चालविणार. मुलांसाठी क्रीडासंकुल, कंपन्यांची संख्या वाढविणार आणि सीएसआरचा निधी गावाच्या विकासासाठीच असावा. आपल्या उश्याजवळ धरण आहे, तरी पाणी मिळत नाही. आता तुमचे मत विकासाला देण्यासाठी किटली चिन्हाला मतदान करा, असे आवाहन किरण दगडे यांनी केले.
तालुक्याच्या विकासासाठी मी आलोय, तुम्ही एक संधी द्या, त्या संधीचे सोनं करून दाखवेल. तुमच्या विश्वासाला तडा जावून देणार नाही.
-किरण दगडे – उमेदवार भोर विधानसभा





