पुणे जिल्हा : धर्मासाठी सामूहिकपणे काम करणे गरजेचे – आमदार बेनके

जुन्नरमध्ये जैन संघाच्या नवीन धर्मशाळेचे
जुन्नर – नवीन पिढी संस्कार क्षम, सुसंस्कृत बनविण्याकरिता तसेच धर्माचा प्रसार करून धार्मिक ऊर्जा सर्वांना मिळविण्याकरिता एक सुसज्ज धर्मशाळा इमारती करिता राज्य शासनाने 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या पुढे धर्मासाठी सर्वांनी सामूहिकपणे काम करणे गरजेचे आहे, असे मत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
जुन्नरमधील श्री श्वेतांबर मूर्ती पूजक जैन संघाकरिता नवीन धर्मशाळा इमारत बांधकामाकरिता आमदार बेनके यांच्या प्रयत्नातून 1 कोटींचा शासन निधी मंजूर करण्यात आला असून या बांधकामाचे भूमिपूजन रविवारी (दि. 30 जून) सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाले त्यप्रसंगी ते बोलत होते. तीर्थरत्ना श्रीजी महाराज, हिंकार रत्ना श्रीजी महाराज, माजी नगरसेवक भाऊ कुंभार आदींसह जैन समाज बांधव महिला, तरुण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीर्थरत्ना श्रीजी महाराज म्हणाले की, भगवान महावीर यांनी धर्माची स्थापना करून समाजाला जागृत केले. जैन धर्मात दानधर्माला मोठे महत्त्व असून भगवान महावीरांनी दाखविलेल्या मार्गावर जो चालणार नाही त्याचा महाविनाशच होणार.
जुन्नरमध्ये धार्मिक कार्याकरिता धर्मशाळा असावी हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता साकार होत असताना या पवित्र धर्मकार्याला समाज बांधवांनी कोणतेही मतभेद न आणता मनापासून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.





