पुणे जिल्हा : दुभाजकावरील लोखंडी पट्ट्या धोकायदायक

बांधकाम विभागाकडून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष
रांजणगाव गणपती : पुणे – नगर महामार्गावर महागणपती मंदिराच्या मागील बाजूस अपघातग्रस्त वाहनांमुळे दुभाजकावरील लोखंडी पट्ट्या वेड्यावाकड्या झाल्या असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एखादा अपघात होऊ शकतो.
नगर महामार्गावर गेल्या दहा ते बारा वर्षांत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. महिन्याकाठी किमान तीन ते चार अपघात हे नित्याचेच झाले आहेत. संबंधित विभागाला अपघातावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे.
बऱ्याचवेळा अपघात झाल्यानंतर जायबंदी प्रवाशांना वेळेत उपचार मिळत नाही. अपघाताच्या ठिकाणी दुभाजकाची दुरवस्था झाल्यानंतर त्याची डागडुजी केली जात नाही. लोखंडी सांगाडे पडून असतात. याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत रांजणगाव सोसायटीचे माजी चेअरमन महेश फंड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना वेळोवेळी सांगून ही लोखंडी पट्ट्या हटवल्या नाहीत. जर या ठिकाणी एखादा अपघात झाला तर संबंधित अधिका-यांनी अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही महेश फंड यांनी केली आहे.





