पुणे जिल्हा : पारगाव सोसायटीकडून सभासदांचा उतरवला विमा

जिल्ह्यात पहिलीच संस्था असल्याचा दावा
पारगाव – पुणे जिल्ह्यातील कृषी सहकारी सोसायट्यांमध्ये अग्रगण्य असणारी दौंड तालुक्यायील सुमारे 2400 सभासद शेतकरी असणारी पारगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सभा 30 सप्टेंबर रोजी संस्थेच्या प्रांगणात ठिबक सिंचन विभागाच्या वादळी विषय सोडून बाकी खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. यावेळी सभासदांचा नैसर्गिक विमा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.असा विमा काढणारी ही जिल्ह्यातील पहिलीच संस्था ठरली आहे.
संस्थेचे कर्जदार सभासदाचे जर निधन झाले, तर त्या मृत सभासदाची कर्जाची रक्कम त्याच्या वारसदारांकडून वसूल करण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची ठरत असल्याने संस्थेच्या संचालक मंडळाने आता सर्व पिककर्जदार सभासदांचा अगदी अल्प रुपयांत नैसर्गिक विमा उतरवण्याची कल्पना अंमलात आणली.
वार्षिक सभेत त्यास मंजुरी मिळाली आहे. वयाच्या 70 वर्षे पर्यंत सभासदांना ही योजना लागू राहणार आहे. एखादा कर्जदार सभासद मृत पावल्यास त्याच्या पीककर्ज विम्यातून त्याचे पिककर्ज भरले जाणार असल्याने संस्थेला त्याचा फायदा होणार आहे.
15 टक्के लाभांश
या वेळी संचालक मंडळाने संस्थेच्या नफ्यातून 15 टक्के लाभांश (36 लाख 63 हजार रुपये) देण्याचे जाहीर केल्याने सभासदांनी या निर्णयाचे स्वागत केले. संस्थेचे चेअरमन तुकाराम ताकवणे व संचालक मंडळाने सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.





