पुणे जिल्हा : मुुलांच्या हातात मोबाइलऐवजी चिखल माती हवी

प्राचार्य सीताराम गवळी : ग्रीन फौउंडेशनतर्फे विजेत्यांचा गौरव
लोणी काळभोर – छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाइलऐवजी त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड-माती, चिखल, काळी-तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. गड किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित, संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील, असे प्रतिपादन पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले.
ग्रीन फौउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त दरवर्षी गड-किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वेळी हवेली तालुक्यातील २७८ तरुण-तरुणी सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रीन फौउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांनी उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, यशवंत कारखान्याचे संचालक योगेश काळभोर, रत्नाताई काळभोर, सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्नाताई वाळके, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा संगीता काळभोर, ग्रीन फौउंडेशनचे प्रतीक कोळपे, गणेश काळभोर, गहिनीनाथ राजे, राहुल कुंभार, किरण भोसले, शुभम जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले. महेश खुळपे यांनी आभार मानले.
स्पर्धेत सोनाली जाधव व मोनाली जाधव यांनी प्रथम क्रमांक, शिवंभू जगताप यांनी दुसरा क्रमांक, शैलेश सोनवणे यांनी तिसरा क्रमांक, सिद्राममळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा चौथा क्रमांक, सिध्देश सागर पंडित पाचवा क्रमांक पटकावला. यावेळी लोणी काळभोर परिसरातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले. सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविले.





