पुणे जिल्हा : वाल्हे परिसरात गणपतींची प्रतिष्ठापना

वाल्हे – परंपारिक ढोल ताशांचे वादन करीत, मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर व गुलालाची मुक्त उधळण करीत, मोठ्या उत्साहात वाल्हे (ता. पुरंदर) व परिसरात गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारपेठमधील, एकता प्रतिष्ठाणच्या वतीने फटाक्यांची आतषबाजीत पारंपारिक ढोलांच्या तालावर गणेशाचे स्वागत करुन, प्रतिष्ठापना केली. आडाचीवाडी येथील अमर तरूण मंडळाने ’एक गाव एक गणपती’ ची परंपरा कायम राखत वाल्हे गावांतर्गत ट्रॅक्टरमधून लाडक्या गणेशाची ’वीर एकलव्य ढोल ताशा पथक’ नायगाव यांच्यासह सवाद्य मिरवणूक काढून, गुलालाची मुक्त उधळण करीत, गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. यावेळी, मोठ्या संख्येने तरूण या मिरवणुकीमध्ये गुलालाने न्हाऊन निघाले होते.
वाल्हे गावचा प्रथम मानाचा गणपती, सावता माळी तरूण मंडळाने पारंपारिक टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. तसेच महात्मा फुले मित्र मंडळांनी साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना केली. कामठवाडी येथील नवजवान तरूण मंंंंडळाने पारंपरिक पद्धतीने ढोल – लेझिम खेळत बाजारपेठेतून मिरवणूक काढून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठापना केली.
नवयुग मिञ मंडळ माळवाडी यांनी डी. जे च्या तालावर मुख्य बाजारपेठेतून, मिरवणुक काढून प्रतिष्ठापना केली. भुजबळ कामठवाडी येथील युवा मिञ मंडळाने, पारंपारिक पद्धतीने, ढोल ताशा च्या तालावर साध्येपणाने मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. सुकलवाडी, अंबाजीचीवाडी येथील मंडळांनीही उत्साहात प्रतिष्ठापना केली. यावेळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या घोषणांनी बाजारपेठ दुमदुमून गेली होती.
येथील कुंभार वाड्यामध्ये गणेशमुर्तींच्या स्टॉलवर सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. बाजारपेठमध्ये गणेशोत्सवासाठी आरासाची दुकाने सजली आहेत. मात्र, दरवर्षी पेक्षा गणेशोत्सवासाठीच्या आरासाची खरेदी कमी प्रमाणात होत असल्याचे, बाजारपेठेतील व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, गणपती पुजनाचा मूहर्त साधत अनेक भाविक आपापल्या भक्ती- भावाप्रमाणे गणेशाची मुर्ती खरेदी करुन, वाहनांमधून, तर काही चालत घरी नेत होते.





