पुणे जिल्हा : सासवडच्या पालखी तळाची पाहणी

आळंदी देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांची भेट देत केल्या सूचना
सासवड – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढ वारीसाठी श्रीक्षेत्र सासवड येथे येत्या 2 जुलै रोजी येत असून त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सासवड येथे करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 13) सोहळ्याच्या निमित्ताने आळंदी देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांची सासवड पालखी तळावर भेट देऊन पाहणी केली. आळंदी देवस्थान संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व बाळासाहेब चोपदार यांनी याप्रसंगी उपस्थित राहून काही सूचना केल्या.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. सासवडच्या पालखी तळाच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करत कर्हा नदीवरील पुलाच्या पुढचे अर्धवट काम सोहळ्यापूर्वी पूर्णत्वाला जाईल, असे देवस्थानचे वीर यांनी सांगितले.
भू संपादन प्रश्न मार्गी लागला असून येत्या 25 जूनपर्यंत पालखी महामार्गावरील कामे पूर्ण करण्याबाबत सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीत अर्धवट रस्त्यांची, पुलांची कामे, ग्रामीण भागांतील धोकादायक होर्डींग्ज या विषयी चर्चा होऊन कार्यवाही करण्यात येईल, असेही वीर यांनी स्पष्ट केले.
सासवड व जेजुरी या नगरपालिकांच्या बरोबरच ग्रामीण भागात देखील सोहळ्यास उत्तम सहकार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सासवड नगरपालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, नगरअभियंता जावेद मुल्ला, कार्यालयीन अधीक्षक उत्तम सुतार, विद्युत विभाग प्रमुख सुलोचना हर्षे, तालुका आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक राहुल टकले, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, संतोष गिरमे, तलाठी सुधीर गिरमे, संभाजी जगताप, राजेंद्र जाधव, शहाजी सस्ते उपस्थित होते.





