पुणे जिल्हा : मीटर रीडिंग एजन्सीची चौकशी करा

मुख्य अभियंता यांना संदीप सातव यांचे निवेदन
वाघोली – मीटर रीडिंग एजन्सीच्या मुळे नागरिकांना जास्तीचे वीज बिले येत असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतीत संदीप सातव यांनी सांगितले की, अनेक ग्राहकांना चुकीची बिल देण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून मीटर रिडींग एजन्सी चुकीचे रीडिंग घेत असून बिलिंग स्टाफ बिल तयार करण्यापूर्वी मीटर फोटो अधिकृत करत नसल्यामुळे बिलिंग तक्रारी वाढत असून नियमाप्रमाणे बिलिंग स्टाफने फोटो अधिकृत केल्यानंतरच बिल तयार करणे गरजेचे आहे; परंतु असे निदर्शनास आले की, रीडिंग एजन्सीचे कर्मचारी खोटी व चुकीचे रीडिंग घेत आहे.
जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांच्या वाढीव बिलाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. वाढीव बिल हे रीडिंग एजन्सीने मोठ्या प्रमाणात चुकीचे रीडिंग फीड केल्यामुळे आले आहे. सर्व ग्राहकांचे एप्रिल 2024 ते जून 2024 या काळातील बिल वर्गीकरण करून देण्यात यावीत. रीडिंग एजन्सीने चुकीचे रीडिंग घेतल्याबाबत त्यांची मान्यता रद्द करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच हडपसर ग्रामीण उपविभागीय कार्यालयातील बिलिंग स्टाफ ने फोटोचे अधिकृत न केल्याबद्दल व रीडिंग एजन्सीवर मॉनिटरिंग न केल्याबद्दल संबधित कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच बिल दुरुस्तीसाठी वाघोली कार्यालयांत कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली सातव यांनी केली.
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी संबंधित रीडिंग एजन्सीची व एजन्सीवर मॉनिटरिंग न करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता राठोड यांना दिले आहे. तसेच बिल दुरुस्ती साठी हडपसर विभागाचे अधिकारी यांची वाघोलीमध्ये नेमणुक करण्याचेही आदेश दिले असल्याचे सातव यांनी सांगितले.





