Pune District : चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अमानुष अत्याचार

राजगुरूनगर : खेड तालुक्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणीवर आचारी काम करणार्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान पीडित 17 वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याची फिर्याद खेड पोलिसांत देण्यात आली. पोलीस तिचा शोध घेत आहेत. अवघ्या चार महिन्यांतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे हे चौथे प्रकरण असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खेड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितले, पीडित 17 वर्षीय तरुणी ही निमगाव खंडोबा येथील मंगल कार्यालयात 18 मे रोजी काम करण्यासाठी गेली होती. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ती लघुशंकेसाठी कार्यालयाच्या स्वच्छतागृहात गेली असता तिच्यावर लक्ष ठेवून असलेला आचारी सचिन पांडे (वय 26, रा. जालना; सध्या चांडोली, ता. खेड) हा तिच्या मागे गेला. त्याने स्वच्छतागृहात पीडितेवर बलात्कार केला. ही माहिती पीडितेने तिच्या लहान बहिणीला सांगितली. लहान बहिणीने खेड पोलीस स्टेशन मध्ये याबाबत फिर्याद दिली; मात्र तेव्हापासून पीडित अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली आहे.
अत्याचारानंतर संबंधित तरुणीने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल म्हणून ती घरातून निघून गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. चांडोली येथील केदारेश्वर बंधार्यावर तिची ओढणी आणि चप्पल सापडल्यामुळे आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
एनडीआरएफच्या दोन टीम गेल्या तीन दिवसांपासून भीमा नदीवरील केदारेश्वर बंधार्यातील पाण्यात तिचा शोध घेत शोध मोहीम राबवत आहेत. मात्र अद्यापही तिचा मृतदेह हाती लागला नाही. पीडितेच्या लहान बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर राजगुरुनगर पोलीस ठाण्यात सचिन पांडे याच्या विरोधात बलात्कार, पॉस्को, अपहरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.





