शिक्रापूर – केंदूर (ता. शिरूर) येथील नेहमी वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड (वय २५) याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावानंतर अखेर त्याला एक वर्षासाठी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली आहे. केंदूर येथील बबलू उर्फ पऱ्हाड हा खून, जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, पिस्तूल बाळगणे आदी स्वरूपाचे गुन्हे वारंवार करत होता. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महेश बनकर, रामदास बाबर, विकास पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, प्रतीक जगताप, किशोर शिवणकर, निखील रावडे यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या बबलू पऱ्हाड यांच्याविरुद्ध प्रस्ताव सादर करून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी पऱ्हाड याच्याविरुध्द एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्याला ताब्यात घेऊन एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गुन्हेगारांची यादी सध्या तयार केली असून त्यांच्यावर देखील मोक्का, तडीपारी यांसह आदी स्वरूपाच्या कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.