Pune District : औद्योगिक वाहतुकीला दिलासा मिळणार

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणासाठी 59 कोटी निधीस मान्यता
राजगुरुनगर – तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 डी राज्य महामार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने तब्बल 59.75 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही मान्यता दिली असून या निर्णयामुळे औद्योगिक व ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महामार्गावरील वाढते अपघात व वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानभवनाच्या पायर्यांवर आमदार सचिन अहिर, सुनील शेळके व माऊली आबा कटके यांच्या सोबत लक्षवेधी आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनानंतर शासनाच्या पातळीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आणि अखेर निधीला मंजुरी मिळाली. या विषयावर 23 जुलै 2025 रोजी पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर आढावा बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रस्ता रुंदीकरणासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला.
चाकण औद्योगिक क्षेत्रात रोजंदारीने मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघातांची शक्यता वाढली होती. नव्या मंजुरीनंतर रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण झाल्यामुळे वाहतूककोंडी कमी होणार असून औद्योगिक वाहतूक सुरळीत होईल. यामुळे शेतकरी, व्यापारी, कामगार वर्गासह वाहनचालकांनाही सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
बीओटी तत्त्वावर काम होणार
तळेगाव-चाकण दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तर चाकण-शिक्रापूर दरम्यान सहा पदरी रस्ता तयार होणार आहे. हे काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर होणार आहे. सुरुवातीला या मार्गाचा समावेश राज्य रस्ते विकास आराखडा 2000-2021 मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग 548 डी असा दर्जा दिला. पुढे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला
हा निधी मंजूर झाल्याने तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाचा मार्ग मोकळा मिळाला होणार आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अर्थमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. या कामामुळे परिसरातील नागरिक, औद्योगिक क्षेत्र तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे,
-बाबाजी काळे, आमदार खेड आळंदी विधानसभा





