पुणे जिल्हा : जुन्नरला रेशन दुकानदारांचा बेमुदत संप

तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले मागण्यांचे निवेदन
लेण्याद्री : विविध मागण्यांसाठी तालुक्यातील रेशन दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवार (दि. 1) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. त्यांनी संघटित होऊन तहसील कार्यालय परिसरात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.
शासनाच्या माध्यमयातून गोरगरिबांपर्यंत अन्न धान्य पोहोचवणारा रेशन दुकानदार हा सर्वच बाजूनी दुर्लक्षित व न्याय हक्कापासून वंचित ठेवला जात असल्याची तक्रार जुन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील गुंजाळ यांनी केली आहे. याप्रसंगी तालुक्यातील धान्य दुकानदारांनी तहसील कचेरीसमोर आंदोलन केले आणि मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले.
या निवेदनात अन्न सुरक्षा योजनेचा मुख्य कणा असलेल्या रेशनदुकानदाराला निश्चित उत्पन्नाची हमी, त्यात वाढ करून किमान 300 रुपये प्रति क्विंटल मिळावे, 7 वर्षांपूर्वी दिलेली आणि कालबाह्य झालेली पॉस मशिन्स बदलण्यात यावीत, आधार- रेशन कार्डला जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता, गोडाउनमधून प्रमाणित करून धान्य मिळावे, धान्याचे परमिट व वाहतूक ठेकेदाराची पोहोच प्रत मिळावी,
धान्य दुकानवेळेतच मिळावे, नवीन रेशन दुकान परवाने मंजूर करताना लोकसंख्या विचारात घेणे, केरोसीन दुकाने पुन्हा सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी उपाध्यक्ष सुजाता डोंगरे, संजय ढोबळे, मोहन वलवणकर, सचिव दिलीप दिक्षित, कार्याध्यक्ष बबन पानसरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.





