पुणे जिल्हा : इंदापूर तालुका विकासाचे मॉडेल निर्माण करेल

आमदार दत्तात्रय भरणे ः जंक्शन एमआयडीसीमुळे कुरवली भागाचा कायापालट होईल
इंदापूर – जंक्शन येथील एमआयडीसी आपण मंजूर केली. कुरवली भागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला हक्काचे काम मिळणार आहे. ज्यांना या एमआयडीसीमध्ये व्यवसाय सुरू करायचे आहेत. त्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.या औद्योगिक वसाहतीतव शेजारी शेती महामंडळाची जमीन असल्यामुळे कधीही जागा कमी पडणार नाही. हजारो एकर जगा उपलब्ध होईल. मोठे उद्योजक या ठिकाणी येतील या भागाचा कायापालट होईल. त्यामुळे मतदार बंधू भगिनींनी साथ द्यावी असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, हनुमंत कोकाटे, तानाजी थोरात, प्रताप पाटील, शुभम निंबाळकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली. याच संधीच्या माध्यमातून, गोरगरीब जनतेला मदत कशी होईल हे काम चोख केले आहे. काम करताना कधीही लांबचा जवळचा असा भेदभाव केला नाही. कुरवली परिसरातील नागरिकांची बारामती जाण्यासाठी रस्त्याची अवस्था काय होती. वीस वर्षात हा बीकेबीएन रस्ता का झाला नाही.
छत्रपती साखर कारखान्याला ये जा करण्यासाठी रस्त्याची काय अवस्था होती. गावातील मागासवर्गीय बंधू तसेच मुस्लिम बांधव यांच्या लोकवस्तीमध्ये रस्ते व गटार तसेच मूलभूत सुविधा आपण पुरवल्या आहेत. इंदापूर तालुक्यात विकासाची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाले आहेत.काही चालू आहेत आगामी काळात हा इंदापूर तालुका विकासाचे मॉडेल निर्माण करेल, असा आशावाद आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
आम्ही पाहुणे होतो; मात्र तोंडातील घास काढला. आयाराम गयाराम यांच्यावर टीका होते; मात्र ही मोठे आयाराम गयाराम असा चिमटा विरोधकांवर काढत, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरणे मामांना साथ द्या.
-आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक





