पुणे जिल्हा : विद्यमान आमदारांनी इंदापूर तालुका तो ठेकेदाराच्या हाती दिला

– हर्षवर्धन पाटील यांची आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका
वडापुरी – पूर्वीच्या सर्वच आमदारांनी इंदापूर तालुका तळहातातील फोडासारखा जपला. परंतु इंदापूरच्या विद्यमान आमदारांनी तो ठेकेदाराच्या हाती दिला. त्यामुळे महाराष्ट्रात इंदापूरची वेगळी ओळख निर्माण झाली, असे म्हणत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली.
यावेळी विलासराव वाघमोडे, मारुतीराव वनवे, दत्तात्रय शिर्के, बाबा महाराज खारतोडे, हनुमंतराव तोबरे, रघुनाथ राऊत, भास्कर गुरगुडे, शांतीलाल शिंदे, विजय देवकर, अजित खबाले, संदेश शिंदे, अमोल इंगळे, रमेश देवकर, अमरदीप काळकुटे, प्रफुल चव्हाण, महेश शिर्के, विष्णू मोरे, श्रीमंत शिंदे, अमोल चंदनशिवे, बबलू पठाण व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
पितृपंधरवडा संपताच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाऊन तुतारी फुंकण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.
इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे आज शनिवारी हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांशी संवाद साधलाय आणि या संवादा वेळीच कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नाराही दिला.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील जनतेचा आग्रह मान्य करून येत्या काही दिवसात इंदापूर विधानसभा लढवण्याबाबत निर्णय घेणार आहे, गेली दहा वर्षात इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय सहन केला. लोकप्रतिनिधी हे तालुक्याचे कुटुंब प्रमुख असतात परंतु त्यांनी वाद लावण्याचे काम केले. त्यामुळे आता परिवर्तन अटळ असून येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यातील विकास कामांचे एक व्हिजन तयार केले आहे.
कार्यकर्त्यांचा आग्रह…
यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. यावेळी पाटील यांनी काही दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चंदनशिवे यांनी केले.





