पुणे जिल्हा : इंदापूर सेवारस्ता शेतकर्यांना डोकेदुखी

शेतीचे रस्ते होणार बंद : बाह्यवळणाशेजारील शेतकर्यांचा विचार करा
इंदापूर : इंदापूर शहराच्या बाहेरून नव्या बाजार समितीच्या लगत राष्ट्रीय महामार्गाचा बायपास असून, आता या बायपासला सेवा रस्ता चालू आहे; मात्र, बारा फुटाच्या खाली हा सेवा रस्ता होणार असल्याने, ये-जा करणार्या प्रवाशांची सोय होईल; मात्र शेजारील शेतकर्यांचा कायमचा रस्ता बंद होईल. त्यामुळे परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इंदापूर बायपासच्या होत असलेल्या सेवा रस्त्याने बारा फूट खोल खड्डा खोदून, सेवा रस्ता होणार असल्याची भीती, परिसरातील शेतकर्यांना पडलेली आहे. या भागात मागासवर्गीय शेतकर्यांच्या छोटे – छोटे जमिनीचे तुकडे आहेत. त्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता कुठून मिळणार हा सवाल शेतकरी करीत आहेत.
मागासवर्गीय शेतकर्यांच्या शेतात जाण्याचे रस्ते बंद केले तर याविरुद्ध तीव्र आंदोलन करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती प्रा. बाळासाहेब मखरे यांनी दिली. हा सेवा रस्ता हा मूळ बायपास हायवे आहे. त्या उंची इतका घ्यावा त्या ठिकाणी खड्डा होणार नाही. याची काळजी घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच संबंधित हायवे अॅथोरिटीच्या, कार्यालयासमोर लवकरच उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु केले जाईल असाही इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
शासनाने जमिनीचे पैसे दिले पाहिजेत
या परिसरातील शेतकर्यांना ज्या जमिनी रस्त्यात गेले आहेत. त्यांना अद्यापी रकमा मिळालेल्या नाहीत. हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत आहे. व न्यायालयीन निकाल होईपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता कामा नये अशी मागणी शेतकर्यांनी केलेली आहे.





