Pune District: लग्नकार्यात पाहुण्याच्या सत्कारासाठी पांढऱ्या टोपीला वाढती मागणी

अवसरी : आंबेगाव तालुक्यात लग्नसराई मोठ्या धूमधड्याक्यात सुरू झाली आहे. लग्नसमारंभात साखरपुडा कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी खादीची सफेद टोपी भेट म्हणून दिली जात आहे. रंगीबेरंगी फेट्यांच्या किमती सर्वसाधारण व्यक्तीच्या आवाक्याबाहेर असल्याने तालुक्यातील विविध लग्न समारंभ कार्यक्रमात पांढरे शुभ्र खादीच्या टोपीला कार्यमालक अधिक पसंती देत आहे. खादी टोपी १५ रुपये पासून ते ३५ रुपयांपर्यंत किंमत असल्याने टोपीचा उपयोग उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने खादी टोपीला मागणी आहे.
ग्रामीण भागात दिवाळीनंतर लग्नसराई चालू झाली असून वधू वरांचे आईवडील, ब्राह्मण लग्नाचे मुहूर्त पाहून लग्नाच्या तारखांची जुळवा जुळव करत आहे. गेल्या काही महिन्यापासून अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, पारगाव, मेंगडेवाडी येथे असणाऱ्या मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे संपन्न होत आहेत. शुभविवाहप्रसंगी साखरपुडा कार्यक्रमाला ग्रामस्थ व पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात.
त्यामुळे पाहुण्यांचा मानपान करणेसाठी साखरपुडा कार्यक्रमात पाहुण्यांना टॉवेल टोपी देऊन सत्कार करतात. खादीच्या टोपीचा उपयोग डोक्याला उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून होत असल्याने या खादी टोपीला पुणे, मुंबई, खेड, चाकण, संगमनेर, हवेली, शिरूरसह महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते.
खादी टोपी पंधरा रुपयांपासून ते ३५ रुपयांपर्यंत मिळते या उलट फेट्यांची किंमत ६० ते ७० रुपये असल्याने सर्वसामान्यांना पाहुण्यांच्या सत्कारासाठी हा खर्च परवडत नसल्याने जास्त करून खादीच्या टोपीचा वापर पहावयास मिळत आहे. त्यामुळे खादी टोपी बनवणारे कारागीर, कामगार यांना चांगले दिवस आले आहेत.




