Pune district : देशमुखवाडी येथे एअरटेलच्या नवीन टॉवरचे लोकार्पण

राजगुरुनगर – देशमुखवाडी व करंजविहीरे या परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर मोबाईल नेटवर्कची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी एअरटेल कंपनीचा नवीन मोबाईल टॉवर देशमुखवाडी येथे कार्यान्वित करण्यात आला आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज (दि. 9) देशमुखवाडी येथे करण्यात आले. संदीप देशमुख यांच्या सहकार्याने व लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास आला. यावेळी लोकार्पण कार्यक्रमास चाकण एअरटेल झोन प्रमुख संदीप जैसवाल, ललित रावते, विशाल दिवाण, किरण देशमुख, स्वप्नील देशमुख, अभि गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
एअरटेल कंपनीच्या अधिकार्यांनी या प्रसंगी सरपंच दत्ता भाऊ देशमुख तसेच प्रकल्पासाठी सहकार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान केला. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, या टॉवरमुळे परिसरातील नेटवर्कची समस्या कायमची दूर होणार असून शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच तातडीच्या संपर्कासाठी सुविधा अधिक सुलभ होणार आहेत.
ग्रामीण भागातील डिजिटल संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सरपंच दत्ता भाऊ देशमुख यांनी सांगितले.





