पुणे जिल्हा : विकासनिधी न आणणारे उद्घाटन करतात

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ः इंदापूर शहरातील सर्व रस्ते चकाचक करणार
इंदापूर – मी मंत्री असताना देखील व मी मंजूर केलेल्या कामाचा संबंध ज्यांचा नाही, असे विरोधक लोक उद्घाटन करतात. त्यांना काही अधिकार आहे का? असा सवाल सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री भरणे यांनी केला.
इंदापूर शहरातील अंबिकानगर व सरस्वतीनगर परिसरातून जाणाऱ्या 33 केव्ही एचटी लाईन अंडरग्राऊंड करणे या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. या कामासाठी 1 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. अंबिकानगर, सावतामाळी नगर येथील नागरिकांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती. त्यामुळे 33 केव्ही लाईन अंडरग्राउंड झालेली आहे.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी, मी स्वतः व या प्रभागातील नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न केले होते. इंदापूर शहराच्या विकासासाठी नुसत्या मागण्या करू नका. प्रस्ताव द्या पाठपुरावा करा, निवडणुका वगैरे हा भाग सोडून द्या. मी कामे मंजूर करून देतो अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.
इंदापूर हे आपले शहर आहे. शहर सुंदर करण्यासाठी, प्रयत्न करणार आहे. तालुक्याचे ठिकाण इंदापूर शहर आहे. या शहरात कोणत्याही भागातील नागरिक इंदापूरमध्ये आला तर, त्याला बदल दिसला पाहिजे. पूर्वीचे इंदापूर आणि आत्ताचे इंदापूर यामध्ये बदल करून दाखवतो. असा शब्द राज्यमंत्री भरणे यांनी देत, शहरातील कोणताही रस्ता परिपक्व करण्याचा सोडणार नाही. अंतर्गत गटारी पूर्ण करणार आहे. यासाठी शहरवासीयांची साथ मला हवी आहे. अडीच वर्ष कोरोणाचे संकटात असताना देखील. या शहरासाठी प्रचंड निधी शासनाच्या माध्यमातून पुरवला आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, मुख्याधिकारी रामराजे कापरे, महावितरणचे रघुनाथ गोपने, नगरसेवक स्वप्नील राऊत, पोपट शिंदे, अनिकेत वाघ, अनिल राऊत, सागर मिसाळ, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





