पुणे जिल्हा : पारगावात वर्गमित्रांकडून माणुसकीची ओंजळ रिती

कमवता मित्रच हरपल्याने कुटुंबाला मदत : अनोखी भाऊबीज
पारगाव –दीपावली उत्सव हा आनंदाचा क्षण. परंतु तो अनेक कुटुंबांना काही कारणांमुळे साजरा करता येत नाही, अशीच एक घटना नुकतीच पारगावात घडली. कमवती व्यक्ती हरपल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या वर्गमित्राच्या कुटुंबासाठी सर्व मित्र मदतीसाठी धावून गेले. कुटुंबाला 16 हजारांची मदत करीत भाऊबीजेला अनोखी भेट दिली. वर्गमित्रांकडून आपल्याच मित्राच्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने माणुसकी आणि दातृत्वाची ओंजळ रिती झाल्याची प्रचिती आली.
दौंड तालुक्यातील पारगाव येथील काही तरुण वर्गमित्रांनी एक अनोखी भाऊबीज साजरी करून एका निधन पावलेल्या वर्गमित्राच्या कुटुंबात आनंदाचा दिवा लावला. 1996 मधील दहावीच्या वर्गातील सर्व मुले आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत. फेब्रुवारी महिन्यात बाळासाहेब शिंदे या त्यांच्या वर्गमित्राचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी व एक मुलगा, असा परिवार आहे. बाळासाहेब हेच घरातील कर्ते पुरुष होते.
त्यांच्या कुटुंबाला दिवाळीची मदत म्हणून सर्व मित्रांनी 16 हजार रुपये जमा केले. बाळासाहेब यांच्या पत्नी सविता शिंदे यांच्या कडे भाऊबीजेच्या दिवशी जमा करून एक अनोखी भाऊबीज साजरी केली. यावेळी विजय शिवरकर, मेजर उत्तम शेळके, धनाजी ताकवणे, बापू भाडळे, तुकाराम ताकवणे, संतोष शिंदे, मेजर शहाजी ताकवणे आदी मान्यवर उपस्थित होते.





