Pune District: राजापूरच्या प्रत्येक शेतात फुलते गुलछडीचे पीक

वीसगाव खोरे : भोर तालुक्याच्या पूर्वेस असलेल्या नीरा नदीच्या तीरावर वसलेल्या साधारण शंभर ते सव्वाशे उंबरठा असलेल्या राजापूर गावामध्ये गुलछडीचे आणि काडी गुलछडीचे पीक हे घरटी घेतले जाते तसेच झेंडू , अॅस्टर, कामिनी, मोगरा , लिली अशा वेगवेगळी फुलांची शेती केली जाते.
यामुळे या गावाला गुलछडीचे व फुलांचे गाव म्हणून परिसरात ओळखले जाते. गुलछडीसाठी आवश्यक असणारे पाणी, तापमान, जमीन, आवश्यक मजूर पुरवठा, वारंगुळा पद्धतीने एकमेकांना मदत करून शेतीची कामे केली जातात. तसेच पुणे येथील गुलटेकडीचे असणारे फुल मार्केट आणि गावातीलच असलेली उत्तम वाहन व्यवस्था यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे ऊस,ज्वारी, गहू, कांदा, भुईमूग या पिकांबरोबरच गुलछडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
गावातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान,हवामान, पाणी, वातावरण, उपलब्ध मजूर यांच्यामध्ये मेळ घालत नगदी उत्पादन देणारी गुलछडी पीक घेत आहे. पूर्वमशागत करताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी आडवी खोल नांगरट करून लागवडीपूर्वी नांगरलेली जमीन किमान एक महिना उन्हात चांगली तापू दिली जाते. आवश्यकतेनुसार शेणखत टाकले जाते. नांगरणी करून, फणपाळी व रोटर मारून जमीन भुसभुशीत करून घेतली जाते. अनेक शेतकरी घरच्या शेतीतच तयार केलेला गुलछडीच्या गंड्याचा वापर करून ४ फूट सरीतील पाटपाण्याचे शेजारी आठ इंचावर गंड्याची लागवड करतात.
त्यानंतर गुलछडीच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी खतांचा पहिला डोस गुलछडीचा फुटवा झाल्यावर साधारणता एक महिना झाल्यावर, सुपला, महाधन, १०:२६:२६ आणि १९ : १९ असा मिश्र खतांचा डोस दिला जातो. दुसरा डोस दोन ते अडीच महिन्यांत देतात. तिसरा डोस साडेतीन महिन्यांत गुलछडीच्या कडेला खड्डा घेऊन किंवा टाकून खतांचा डोस दिला जातो. तसेच पाण्यातून ही फुटव्यासाठी औषधे सोडली जातात वातावरणात होणाऱ्या बदलानुसार कीटकनाशकाची फवारणी केली जाते. विशेषत: थंडीच्या काळात फुलांची विशेष काळजी घेतली जाते. काही शेतकरी पाटपाणी तर काही शेतकरी स्प्लिंकर, रेन पाईप, ठिंबक यांचा वापर करून आवश्यकतेनुसार तापमानातील बदलानुसार पाणी देतात.
राजापूर गावामध्ये जवळपास ९५ टक्के लोक शेतीचा व्यवसाय करताना नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे गुलछडी पीक घेतले जाते. गुलछडीला वर्षभर मागणी असते कोणताही आनंदाचा उत्सव या शिवाय पूर्ण होत नाही. भावामध्ये चढउतार होत असतात साधारणतः सध्या काडी गुलछडीला १५० ते २७० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तसेच गुलछडीला पन्नास ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे दर मिळतो. काडी गुलछडी साधारणत: दुपारी चार वाजेनंतर कापली जाते घरी आणून त्याचे दहा काडीचे बंडल बनवले जातात. नंतर सर्व बंडल एकत्र करून १०-१० चा मोठा बंडल बांधला जातो. तसेच पहाटे पाच ते सात या वेळेमध्ये गुलछडी तोडून बाजारपेठेत पाठवली जाते.
– किरण राजेंद्र बोबडे, अजय लक्ष्मण बोबडे, प्रयोगशील शेतकरी राजापूर (ता.भोर)फुलांचा हार, गजरे, माळा, वेण्या, लग्नसमारंभासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांना मागणी असते. फुलदांड्यांचा फुलदाणी, पुष्पसजावट, सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी होत असल्याने निशिगंधाच्या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते. पाणी,खत,तण नियंत्रण यांचे सुयोग्य नियोजन करून जास्त उत्पादन घेता येते. पुण्याच्या मार्केटजवळच असल्याने हक्काची बाजारपेठ उपलब्ध असल्याने रोजच्या रोज चांगल्या भावाने विक्री होते. यामुळे राजापूर गावात गुलछडीचे घरटी पीक घेतले जाते.
– नवनाथ बोबडे, सुदाम इंदलकर,योगेश बोबडे. प्रयोगशील शेतकरी,





