Pune District : महाळुंगे पडवळ कालव्यावर पर्यायी पूल त्वरित उभारा

मंचर : महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे डावातीर कालव्यावरील पूल कोसळल्याने या भागातील शेतकऱ्यांची जवळच्या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. जलसंपदा विभागाने तातडीने पुलाची उभारणी सुरू करावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पूल तयार करण्यासाठी कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याबरोबर संपर्क साधून तातडीने पुलाचे काम सुरू करण्याची मागणी केली. काम पूर्ण होईपर्यंत संबंधित भागातील शेतकऱ्यांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्याच्या सूचना बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी केली.
पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बऱ्याच वेळा ठेकेदार-अधिकारी यांच्या संगनमताने कामाचा दर्जा निकृष्ट होत असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला.यावेळी तालुका संघटक नितीन भालेराव,रोहन कानडे, राहुल पडवळ, सुमित वर्पे, प्रमोद पिंगळे, हर्षल भालेराव, संजय आंबटकर, आप्पासाहेब आवटे, पंढरीनाथ चासकर, अनिल पडवळ, सुधीर उदार आदी उपस्थित होते.
डाव्या कालव्यावरील पूल पडल्याची घटना घडल्यानंतर लगेचच पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला आहे. पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये नवीन पुलाचे काम पूर्ण केले जाईल.
– प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प कार्यालय, नारायणगाव.





