पुणे जिल्हा : निघोजेत डीझेलचा बेकायदेशीर साठा

नऊ जणांवर गुन्हा दाखल ः खेड तहसीलदारांनी दिली फिर्याद
चाकण – चाकण औद्योगिक वसाहतीतील खेड निघोजे गावच्या हद्दीत गट नंबर-260 मधील पार्किंगमधील टाकीमध्ये बेकायदेशीर डीझेल साठवणूक करून विनापरवाना मशीनद्वारे मिसळून ते कंटेनरमध्ये भरत असताना मिळून आले. तसेच कोणतीही सुरक्षा प्रणाली वापरली नसल्याचेही निदर्शनास आल्याने एकूण 9 जणांवर विविध कलमांच्या अनुषंगाने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, 22 ते 24 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान निघोजे गावच्या हद्दीतील जमीन गट नंबर 260 मध्ये असणार्या टाकीमध्ये डीझेल साठवणूक करून विनापरवाना मशीनद्वारे एकूण 36 कंटेनरमध्ये टँकरमधील डीझेल मोटारीच्या सहाय्याने प्लॅस्टिक टाकीमध्ये मिसळून ते कंटेनरमध्ये भरताना आरोपी मिळून आले. असे बेकायदेशीर काम करताना आरोपींनी त्याठिकाणी कोणतीही अग्नीसुरक्षा यंत्रणा जागेवर तयार ठेवली नसल्याचेही फिर्यादी तहसीलदार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्फोट होऊ शकला असता. या कारवाईत 3600 लिटर डिझेल, 2 टँकर तसेच 36 कंटेनर, 4 कॉम्प्युटर, 1 होंडा कंपनीचे जनरेटर, 3000 लिटरची प्लॅस्टिक टाकी व इतर महत्वाचे साहित्य मिळून आले आहे.
या झालेल्या कारवाईत आरोपी अमित बम व त्याचा मॅनेजर सत्यप्रकाश यादव, दिनेश नवानी, रमेश किसन इंगोले, मनेश मनोहर जागडे, प्रभूनाथ राजभर यांच्यासह जमीन मालक गणपत कचरू बेंडाले, सतीश कचरू बेंडाले, सिद्धार्थ सुनिल बेंडाले व इतर संबंधित जागा मालक यांनी जागा भाड्याने देवून संगनमत करून निघोजे गावच्या हद्दीत डिझेल टाकीमध्ये बेकायदेशीर साठवून विक्री केल्या प्रकरणी वरील सर्व आरोपीवर भारतीय न्याय संहिता(बीएनएस) 2023 कलम 287 व कलम 288 तसेच विस्फोटक पदार्थ प्रकरणी अनाधिकृत साठा केल्याने विस्फोटक कायदा 1908 चे कलम 3 व 4 (ब) व 6 नुसार तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम,
1955 मधील कलम 3 व 7 नुसार तसेच पेट्रोलियम कायदा 1934 कलम 23 पोट कलम 1(अ), मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डीझेल (रेग्युलेशन अँड सप्लाय डिट्रीब्युशेन प्रिव्हेशन ऑफ मालप्रॅक्टिसेस) ऑर्डर 2005 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात स्वतः खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी तहसीलदार यांनी पंचनामा करून स्वतः आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करीत आहेत.





