पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्यात अवैध धंदे जोमात

अधिकारी निवडणुकीत व्यस्त, धंद्यांची संख्या झालीय जास्त
पळसदेव – संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त झाली आहे. याचा फायदा घेत इंदापूर तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. महामार्गालागत बेकायदा दारू विक्री, मटका, रात्रीच्या वेळी गौणखनिज उपसा यांसारखे धंदे जोमात सुरु आहे. त्यामुळे निवडणूक कामामुळे अधिकारी व्यस्त असल्याचा फायदा घेत अवैध धंदेवाल्यांना अच्छे दिन आले असल्याचं चित्र इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
तालुक्यात मागे श्रीकांत पाटील तहसीलदार असताना गौण खनिज उपसा करणार्यावर चांगली वचक होती; मात्र त्यांच्या बदलीनंतर सध्या गौण खनिज उपसा करणार्यांचा रात्रीचा खेळ जोमात सुरु आहे. शिवाय मतदारांना भुलवण्यासाठी नेते मंडळाची कार्यकर्त्यांना जेवणावळी, दारूच्या पार्ट्या देत आहेत. त्यामुळे हॉटेलदेखील रात्री उशिरापर्यंत सुरु आहेत. तालुक्यात अवैध रित्या दारू, गुटखा विक्री जोमात आहे. त्यामुळे या अवैध धंदे करणारांना कोणाचाच धाक राहिला नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.
तरी या धंद्यांना वेळीच आवर न घातल्यास ऐन निवडणूक काळात कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत; मात्र पोलीस आणि महसूल यंत्रणेशी हात मिळवणी करून बेकायदा कामे जोरात सूर असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर गौण खजिना उपसा, बेकायदा दारू, गुटखा व मटका यावर कारवाई होणार का, या बाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.





