मंचर नागरिकांच्या संपर्काच्या जोरावर मी पुन्हा येणार असून 2029मध्ये जनतेला वाटले तर लोकसभा निवडणूक लढवू. त्यात चुकीचे काय आहे, असे प्रतिपादन म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि. 8) केले. लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत आढळराव पाटील यांनी विविध विषयांना स्पर्श केला. मागील 20 वर्षांच्या राजकारणात एक रुपया खाल्ल्याचा आरोप माझ्यावर झाला नाही. खासदार नसताना सुद्धा मंचर नगरपंचायतीसाठी 100 कोटींचा निधी आणला आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 136 कोटी मंजूर केले. मात्र काही जण मंचर नगरपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताहेत. या कामांची टेंडर निघून ती पूर्ण होत आली आहेत. मग आताच भ्रष्टाचाराचा आरोप कसा होतो, असा सवाल करून ते म्हणाले निवडणुका लवकरच होणार आहेत. काम करणार्या एका ठेकेदाराने मला सांगितले की, संबंधितांनी ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. ते न दिल्यानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, अशा बोलण्याला मी किंमत देत नाही, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. मी राजकारणात सक्रिय आहे. दररोज लोकांना भेटतो, रविवारी जनता दरबार नित्यनेमाने सुरू आहे. गावागावात विकास कामांसाठी निधी दिला जातोय. मी सक्रिय राहणार व पुन्हा येणार 2029 मधील लोकसभा निवडणुक लोकांना वाटले तर लढवणार असून त्या चुकीचे काय असा सवाल त्यांनी केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरा केला जात नाही.विशेषता 2019 पासून पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे असे सांगून पाठपुरावा का होत नाही हे जनतेला समजले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर युती अवघड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची आमची भूमिका आहे. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र ग्रामीण भागात युती होईल असे वाटत नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील. त्यानुसार काम करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्तचा संकल्प म्हाडाच्या मार्फत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जे काम चालू आहे ते सुरू ठेवण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने केला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले. जनता दरबारात समस्या सोडवण्याचा प्रयत्न लोकसभेतील पराभवानंतरही मी राजकारणात व सामाजिक जीवनात सक्रिय आहे. सर्वसामान्य लोकांना भेटतो, जनता दरबारात समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. गावागावांमध्ये विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. माझा पराभव जरी झाला असला तरी मी घरी बसलेलो नाही, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नमूद केले. फोटो : आढळराव पाटील