विरोधकांच्या पोटात दुखतयं बारामती – कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, कायद्याच्या कसोटीवर मी सगळं बघितलंय. ब वर्गातून संचालक होऊन कारखान्याचे चेअरमन होता येतं, अन् मीच पाच वर्ष चेअरमन राहणार. मी तुमचा विश्वासघात करणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गुणवडी येथे दोन दिवसांपासून विरोधकांनी ब वर्गातून चेअरमन होता येत नाही, असे सांगण्यास सुरुवात केली होती. त्याला पवार यांनी प्रत्युत्तर दिले. पवार यांनी पुणे जिल्हा बँकेमध्ये रणजीत तावरे यांना संचालक केले. तेव्हा विरोधक म्हणाले, यांना वेळ नाही. पण मी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था केली होती. अर्थात मी यापुढे संचालक होणार नाही, असे ठरवले पण मी चेअरमन होणार नाही, अशी कुठे म्हणालो, अशी पुस्टी त्यांनी यावेळी जोडली. मी अध्यक्ष होणार आहे, मग त्यांच्या पोटात का दुखते, असा सवाल पुन्हा त्यांनी एकदा केला. अजित पवार यांनी यावेळी चंद्रराव तावरे यांच्यावरील टीका केली. ते म्हणाले, सलग पाच वर्षे महाराष्ट्रामध्ये उच्चांकी भाव देणार आहे. मी कारखान्याची गाडी वापरणार नाही, मी कारखान्याचा ड्रायव्हर वापरणार नाही. विरोधकांचे वय 85 वर्षाच्या आसपास आहे. त्यांना विस्मरण होत आहे. त्यांना हाताला धरून उठवावं लागतं. बसवाव लागत. जरा थांबा की, का लोकांनी नाकारल्यावर थांबणार? असे अजित पवार यावेळी चंदनराव तावरे यांना उद्देशून टोला लगावला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी 12 सभांचे आयोजन केले आहे. (दि.१८) कारखाना परिसरात त्यांच्या तीन सभा होणार आहेत. जानुबाई मंदिर शिरवली, संगम लॉन्स कमळेश्वर, साई मंगल कार्यालय एमआयडीसी पणदरे येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे.