पुणे जिल्हा : आणखी किती सत्वपरीक्षा घेणार?

लोणी काळभोरमध्ये होर्डिग्जचे मायाजाल जीवावर
लोणी काळभोर : अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे महाकाय होर्डिंग कोसळले. मुंबईतील घटना ताजी असताना कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ गुलमोहर लॉन्स येथे घडली आहे. दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासन आणखी बळी जाण्याची प्रतीक्षा करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत आहेत. होर्डिंग्जमुळे प्रवासी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. कदमवाकवस्तीची दुर्घटना थोडक्यात निभावली आहे. यावेळी सुदैवाने बळी गेला नाही. किरकोळ दुखापतीवर निभावले आहे. मात्र, यातून संबंधित प्रशासन बोध घेणार काय, का कागदोपत्री घोडे नाचवणार, असा सवाल उमटत आहे.
मलईदार महामार्गावरील पळवाटा
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, पंधरा नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत. या महामार्गावर संबंधित प्रशासनाला मलई मिळत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
दुर्घटनेनंतरच जाग येणार काय?
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या लावलेले आहेत. आता गुलमोहर लॉन्स येथील होर्डिंग पडून दोघेजण जखमी झाले आहेत. या धोकादायकरीत्या लावलेल्या होर्डिंगमुळे अजून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार का, एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.





