Pune District: उजनीकाठच्यांनी किती दिवस पुणेकरांचे मलमूत्र प्यायचे

पळसदेव : सरकारच्या निष्काळजीपणाने पुणे व पिंपरी चिंचवड, कुरकुंभ परिसरातील एमआयडीसी व शहरातील सांडपाणी व्यवस्थित प्रक्रिया ना करता थेट नदीपात्रात सोडल्याने उजनी काठावरील नागरीकांना तसेच सोलापूर, उस्मानाबाद येथील नागरिकांना पुणेकरांचे मलमूत्र व रसायनयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशाच्या शाश्वत विकासाचे स्वप्न पाहून नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक आजार होत आहेत. या भागात कॅन्सर रुग्णाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालून कसल्या विकासाच्या गप्पा सरकार मारत आहे, असा परखड सवाल जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी यांनी उपस्थित केला.
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील दुर्गा माता मंदिरात उजनी जलाशय दूषित पाणी प्रश्नासंदर्भात आयोजित जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्रसिंह राणा बोलत होते. राजेंद्रसिंह पुढे म्हणाले, उजनी पाणी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आपली आहे. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन ही लढाई लढावी लागेल. सरकारला उजनी पाणी प्रदूषण बाबत माहिती असताना देखील शासन याबाबत गंभीर नाही. सरकारला केवळ विकास पाहिजे. उजनीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.
माणसांबरोबर पशु, पक्षी यांच्या आरोग्यावर देखील परिणाम झाला आहे. शिवाय शेतजमिनी देखील नापीक होत आहेत. अनेक मासे देखील मरत आहेत. दूषित पाण्यामुळे या भागात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याचा धोकादेखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या वेळी जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, तेलंगणाचे माजी मंत्री व्ही. प्रकाशराव, बारामती अॅग्रोचे राजेंद्र पवार, आंध्रप्रदेशचे सत्यनारायण बोलीशेट्टी, रमाकांत कुलकर्णी, सुनील रहाणे, आकांशा पांडे, भजनदास पवार, मारुती वणवे, हनुमंत बंडगर, गुराप्पा पवार, सचिन बोगावात, पांडुरंग जगताप, संपत बंडगर, बाबा धवडे, संतोष सवणे, सखाराम खोत यांसह इंदापूर, दौंड तालुक्यातील नागरिकांसह आंध्र प्रदेशातील नागरिक उपस्थित होते.
आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणार
यावेळी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली उजनी बचाव समितीची स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत सहा नवीन कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये उजनी प्रदूषण करणे व उपाय समिती, शैक्षणिक संस्था शाळा संपर्क समिती, मंदिर देवस्थान संपर्क समिती, लोक प्रतिनिधी जनजागृती समिती, सोशल मीडिया यांच्याशी संपर्क समिती, न्यायालयीन लढाईसाठी वकील समिती बनवण्यात आल्या. यांची दर महिन्याला बैठक होणार आहेत. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे यांना सहभागी करण्यात आले आहे. यानुसार उजनी परिसरातही गावातील शाळा, कॉलेजसह नागरिकांमध्ये जाऊन पाणी प्रदूषण बाबत जनजागृती करून लोकचळवळ उभा करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. आवाज दिल्लीपर्यंत पोहचला पाहिजे, असं आंदोलन उभारण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.





