पुणे जिल्हा : विजेचा कडकडाटाने घरातील उपकरणे जळाली

मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. विजेच्या कडकडाटामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होऊन कळंब गावामध्ये बहुतेक विद्युत पोलवर मोठा जाळ होऊन अचानक हाय व्होल्टेज झाल्याने घरातील दूरचित्रवाणी संच, संगणक, फ्रीज आणि इतर विजेची उपकरणे जळाल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने भरपाई द्यावी, अशी मागणी ही ग्राहकांनी केली आहे.
गुरुवार रात्री विजेचा जोरदार कडकडाट झाल्यामुळे विजय कुदळे यांच्या कॉम्प्युटरसेंटरमध्ये अचानक बिघाड होऊन कॉम्प्युटर बंद पडले. संतोष वाळुंज यांचा तीन महिन्यापूर्वी हप्त्यावर घेतलेला एलईडी जळाला. इस्माईल शेख यांचा फॅन व वायफाय नेटवर्कचा राऊटर जळाला. युको बँकेतील वायफाय नेटवर्क जळाले. निखिल फापाळे यांचे इन्व्हर्टर बॅटरीच्या वायरी अचानक तुटून मोठा आवाज झाल्याने तेथे बसलेले नागरिकही घाबरले होते. तसेच शुक्रवारी पावसाचे वातावरण झाल्याने विजेचा मोठा कडकडाट झाला.
कळंब गावठाणा मध्ये दहितुले आळी येथील विद्युत पोलवर मोठा जाळ झाला. सतर्क नागरिकांनी ही घटना महावितरणला कळवल्यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. दहितुले आळी येथील विद्युत पोल, कमलजादेवी मंदिरात जवळील विद्युत पोल आणि त्याच्या समोरील बाजूचा कोष्टी आळीचा विद्युत पोल या ठिकाणी तारांचा मोठा झोळ निर्माण होऊन लोखंडी पोल झुकले. कळंब गावठाणातील विद्युत पोलचा सर्वे करून सदर ठिकाणी दुरुस्ती करावी. अशी मागणी सरपंच उषा सचिन कानडे, उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, कळंब गावठाणातील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कानडे, ज्योती येवले, रश्मी मोरे यांनी केली आहे.
लवकरच कामे मार्गी लावू
महावितरणचे अधिकारी माधव मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले काही नागरिकांचे विजेची उपकरणे जळाली आहे. ग्रामपंचायतीने गावठाणात कोणते पोल दुरुस्त करायचे आहे. याचे लेखी निवेदन दिल्यानंतर सदर निवेदन घोडेगाव येथील कार्यालयात सादर केल्यानंतर मंजूर झाल्यानंतर मेंटेनन्सचे कारागीर हाताशी घेऊन विद्युत पोल संदर्भातील कामे मार्गी लावले जातील.
हाय व्होल्टेजमुळे बॅंक व्यवहार ठप्प
हाय व्होल्टेजमुळे युको बँकेचे जिओ आणि बीएसएनएलचे वायफाय नेटवर्क जळाल्यामुळे युको बँकेतील व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच युको बँकेची एटीएम सुविधा बंद पडली आहे. युको बँकेमध्ये नेटवर्क हे बहुतांशी वेळा बंद असल्याने व एटीएम सेवाही विस्कळीत असल्याने नागरिकांना मनस्ताप होत असल्याचे गणेशवाडी येथील युको बँकेचे ग्राहक संपत शिवाजी भालेराव यांनी सांगितले.
युको बँकेकडे जिओ आणि बीएसएनएल हे दोन्ही नेटवर्क आहे. संबंधित उपकरणे दुरुस्ती करून ग्राहकांना सेवा केली जाणार आहे,
– नीतू कुमारी सिंग, व्यवस्थापक, युको बॅंक.





