पुणे जिल्हा : हिंगणीबेर्डी व मलठण शिव रस्त्याचे काम मार्गी

आमदार कुलांकडून दहा लाखांचा निधी
मलठण – दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी व मलठण शिव रस्त्याची बिकट अवस्था झाली होती. याबाबत दि. १९ जून रोजी दैनिक प्रभातमध्ये वृत्त प्रसिध्द केले होते. परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांच्या मागणीवरून दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून अखेर रस्त्याची दुरुस्ती व मुरमीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
मौजे हिंगणीबेर्डी व मलठण या दोन्ही गावच्या शिवेवरुन हा रस्ता असल्याने सुमारे दोनशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर दळणवळणासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. काही प्रमाणात लोकवस्ती आहे. परंतु रस्त्याची खूप दुरवस्था झाली होती. पावसाळा सुरू असल्याने या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे असल्याने पायी चालणे देखील जिकिरीचे झाले होते. शेतमजूर व नागरिकांचे प्रचंड हाल होत होते.
या सर्व समस्या प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्याने आमदार राहुल कुल यांनी प्रत्यक्ष दखल घेऊन सुमारे दहा लाख रुपये एवढा निधी या रस्त्याच्या मजबुतीकरण व मुरुमीकरणासाठी मंजूर करून प्रत्यक्ष कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
यावेळी दौंड भाजपचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, दौंडचे माजी नगरसेवक प्रवीण परदेशी, मलठणचे युवा नेते अमर परदेशी, ग्रामपंचायत सदस्य विकास ढवळे, मुरलीधर भोसले, माजी चेअरमन भाऊसाहेब कामठे, अशोक गोधडे, दादासाहेब ढवळे, हनुमंत कामठे, देविदास धुमाळ, रोहिदास भोसले, प्रभाकर भोसले, माजी उपसरपंच गोरख कोपनर, दीपक ढवळे, कुंडलिक चौधरी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.





