पुणे जिल्हा : कोंढावळे हद्दीत हेलिकॉप्टर कोसळले

चौघे जखमी : एकाची प्रकृती चिंताजनक
पौड – कोंढावळे (ता. मुळशी) येथे मुळा नदीकाठी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पडिक शेतात कोसळले. हेलिकॉप्टरमधील चारही जण सुखरूप आहेत. ही घटना शनिवारी (दि.24) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पायलटने प्रसंगावधान राखल्याने हेलिकॉप्टर नदीत न पडल्याने मोठा अनर्थ टळला.
यात अमनदिप हरभजनसिंग खोकर, स्टीबन बर्नाड राज, धीर भाटीया (तिघेही रा. मुंबई), संजय आनंद (दिल्ली), अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. मुंबईच्या ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. संजय आनंद आणि स्टिबन राज हेलिकॉप्टरचे पायलट होते.
अभियंता अमनदिप खोकर आणि तंत्रज्ञ धीर भाटीया हे पाठीमागे बसलेले होते. चौघेही त्यांच्या खासगी कामानिमित्त मुंबईच्या जुहूहून हैद्राबाद विजयवाडा येथे चालले होते. मुळशी तालुक्यात शुक्रवार (दि.२३) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. ढगाळ वातावरणामुळे पुढचे अस्पष्ट दिसत होते. खराब हवामानामुळे प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर जमीनीवर उतरविण्याचा दोघा पायलटनी निर्णय घेतला. सुरक्षित जागा शोधण्यासाठी पौड, करमोळी बाजूनेही हेलिकॉप्टरने घिरट्याही मारल्या होत्या.
मात्र, मुळा नदीकाठी वाटाणे यांच्या शेतात हेलिकॉप्टर उतरविण्याच्या प्रय़त्नात खाली असलेल्या बाभळीच्या झाडांना त्याची धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, हेलिकॉप्टरचा पंखा आणि पाठीमागची बाजू याचे तुकडे झाले. बाभळीचे झाडही मोडून पडले. संजय आऩंद हे जखमी झाले. हेलिकॉप्टर खाली कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. हेलिकॉप्टर कोसळलेल्या जागेपासून मनोहर वाटाणे यांचे गारवा हॉटेल अगदी दोनशे मीटर अंतरावर होते.
हेलिकॉप्टर कोसळल्याचा आवाज ऐकताच संगीता आणि मनोहर वाटाणे हे दाम्पत्य, रोहित, रसिक ही मुले, हॉटेलमधील कर्मचाऱी आणि आसपासच्या परिसरातील युवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत हेलिकॉप्टरमधील अमनदिप खोकर, धीर भाटीया, स्टीबन राज यांनी स्वतःला सावरत बेशुद्ध झालेले संजय आनंद यांना उचलून शेताच्या बांधावर सुरक्षित ठिकाणी आणले. वाटाणे दाम्पत्य आणि हॉटेलमधील कर्मचारी, युवकांनी दोघांना झोळीतून, खाटेवरून उचलून आणले. हॉटेलच्या ठिकाणाहून रूग्णवाहिकेतून दोघांनाही पौडच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून डॉ. प्रज्ञा संघवी यांनी लवळे येथील सिम्बॉयोसिस रूग्णालयात तातडीने उपचारासाठी पाठविले.
बघ्यांची घटनास्थळी गर्दी
मावळ मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी जखमींना तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पौड पोलिसांची कुमकही घटनास्थळी तपासासाठी दाखल झाली होती. सोशल मीडियावर हेलिकॉप्टर कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आसपासच्या परिसरातील बघ्यांची घटनास्थळी गर्दी झाली होती.





