पुणे जिल्हा : वाघोलीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव पणाला लावून केले कार्य

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांचे गौरवोद्गार
वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील खाजगी तथा शासकीय हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रसंगी आपले जीव देखील पणाला लावून कार्य केले असून हे कार्य माणुसकी चे खरे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार वाघोलीचे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी काढले.
वाघोली तालुका हवेली येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना राजेंद्र अमृतराव सातव पाटील व जयश्रीताई राजेंद्र सातव पाटील आणि महिला विकास आघाडी बचत गट यांच्या वतीने कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी यांना सातव पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद चे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या पाठबळावर वैद्यकीय सेवा उत्तम देण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांकडून केला जाणारा यथोचित गौरव हा वैद्यकीय सेवेचा खऱ्या अर्थाने गौरव म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड यांनी दिली.





