Pune District : रसायनमुक्त शेतीसाठी ज्ञानशक्ती संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद

-अॅड. प्रदीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन
मंचर – विषमुक्त शेतीसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने देशी वाण लावून आपली शरीर संपदा जपावी. कॅन्सरमुक्त देश करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. यासाठी जीन बँक नागपूर व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी सोमवार, दि.१ रोजी व्यक्त केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील शरद बँकेच्या दत्तात्रय वळसे पाटील सभागृहात कृषी दिनानिमित्त आंबेगाव तालुका पंचायत समिती, कृषी विभाग वन, बाजार समिती व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने देशीवान उत्पादन करणाऱ्या आठ शेतकरी महिलांच्या सन्मान प्रसंगी अॅड. वळसे पाटील बोलत होते. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, बाजार समितीचे सभापती निलेश (स्वामी) थोरात, उद्योजक अशोकराव बाजारे,दिलीप लोखंडे, ऋषिकेश गावडे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे,वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले, रंजना शेटे,रागिणी बोऱ्हाडे,
कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.” बीज माता राहीबाई पोपरे यांच्याकडून खरेदी केलेले देशी वाण जीन बँक व संस्थेमार्फत ७० शेतकऱ्यांना मोफत वाटप केले आहे. रसायनमुक्त शेतीचा प्रचार व प्रसार उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे“. असे ज्ञानशक्तीच्या मुख्यकार्यकारी अधिकारी गार्गी काळे पाटील यांनी सांगितले.प्रकल्प अधिकारी सलमान शेख यांनी सादरीकरण केले. मनिषा गावडे ,रोहित थोरात,अपेक्षा वाघुले यांनी मनोगत व्यक्त केले. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचलन केले.
रसायनमुक्त शेती याबाबत जीन बँक नागपूर व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. याबाबत गावोगावी चळवळ उभी राहिली पाहिजे. शेतकऱ्यांनी किमान पाच ते दहा गुंठे देशी वाण लागवड करून उत्पादित भाजीपाला व तरकारीचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी करावा. कुटुंब विविध आजारापासून मुक्त होण्यास मदत होईल.
– सिद्धेश ढवळे, कृषी अधिकारी, आंबेगाव तालुका.
पुरस्कार प्राप्त शेतकरी
दिपाली अभंग (अवसरी खुर्द), अश्विनी उभे(दांगटवाडी), जयश्री धुमाळ (पेठ), सुनंदा चासकर (लांडेवाडी), वनश्री वाळुंज (जवळे), मनीषा गावडे (गावडेवाडी), मळगंगा महिला बचत गट, भैरवनाथ महिला बचत गट(पारगाव तर्फे खेड).





