पुणे जिल्हा : वाढपी पंगतीला बसला की जास्त वाढतो

अजित पवार यांचे प्रतिपादन
बारामती – वाढपी तालुक्यातला पंगतीला बसला की जास्त वाढतो, तसं मीही इकडे जास्त निधी दिला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, मी कामाचा माणूस आहे. सरकारमध्ये माझं ऐकलं जातं. किती मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये निधी येतो, फलटणची काय अवस्था आहे, पुरंदरची काय अवस्था आहे.
इंदापूरमध्ये दत्ता भरणे यांना मी पाच वर्षात साडेपाच हजार कोटी दिले. मी 9 हजार कोटी आणले. वाढपी आपल्या तालुक्यातला पंगतीला बसला की जास्त वाढणारच ना. मनुष्य स्वभाव आहे. आईदेखील चौघं जेवायला बसली की, लाडक्या लेकाला करंजी घालती, कढी घालती, सगळं घालती. गुपचूप घालती पण देते ना. तसं मी केलं. तुम्ही मला नंबर एकने निवडून दिले. मी नंबर एकचा निधी दिला.
लोकसभेला शरद पवार यांना खूश केले, आता मला खूश करा. माझी विनंती आहे. गावचे वाद माझ्या निवडणुकीत काढू नका. विकासाचा विचार करा. शरद पवार यांनी पाच सभा घेतल्या. तेव्हा ते म्हणाले, दीड वर्षाने मी थांबणार आहे. ते 84 वर्षांचे आहेत, त्यांनीच सांगितलं. मी म्हटलेलं नाही, पुन्हा माझ्या नावावर पावती फाडू नका. कोण बघणार आहे तालुका, असा सवाल त्यांनी केला.





