Pune District : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले हिरव्या पाण्याचे नमुने

भाटघर – गेल्या चार दिवसांपासून भाटघर धरणाच्या उत्तरेकडील धरणाच्या भिंतीपासून काही अंतरावर हिरवेगार पाणी दिसत होते. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याची तात्काळ दखल घेत प्रशासनाने या पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पुढील चार दिवसात संबंधित पाण्याचा रिपोर्ट आल्यानंतर पाण्याचा हिरवा रंग का झाला याचा उलगडा होईल.
धरणातील हिरव्यागार पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे भाटघर धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाटघर धरणात हिरवेगार पाणी दिसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार दिवसांपासून धरणात हिरवेगार पाणी असल्याने संगमनेर व शेजारील गावात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नऱ्हे व माळवाडी येथे खाजगी दवाखाना असून सद्यस्थितीला दोन्ही दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. गावातील वयस्कर व चिमुकल्यांच्या जीवाला जास्त धोका निर्माण झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणी गडूळ होऊन दूषित झाले आहे. परंतु चार दिवसांपासून पाण्याचा रंग बदलला असून पाणी हिरवेगार दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याने तपासणीसाठी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.





