Pune District: हिरवेगार डोंगर पडले काळेकुट्ट

दिवे : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून शेताच्या बांधावरील गवत जाळण्यासाठी शेतकरी बांध पेटवित आहेत. मात्र ही आग काही वेळातच रौद्ररूप धारण करून संपूर्ण परिसर भस्मसात करीत आहे. या आगीने तालुक्यातील मोठमोठी जंगलेची जंगले जळून नष्ट होत आहेत.
विविध प्रजातीची झाडे त्याचबरोबर वर्षानुवर्षे जंगलात वास्तव्य करणारे पशु पक्षी, प्राणी, हजारो प्रकारचे कीटक यांचेही अस्तित्व नष्ट होत चालले आहे. यातून निसर्गाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. पावसाळ्यात जे डोंगर सर्वत्र हिरवेगार दिसतात तेच डोंगर जळून नष्ट झाल्याने सध्या काळे पडलेले दिसून येत आहेत.
दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात शेतकरी आपापल्या शेतांचे बांध मोकळे झाले की, पेटवून देतात. त्याच बरोबर विविध भागातून प्रवास करणारे प्रवासीही सहजच आग लावून पुढे निघून जातात. मात्र पाठीमागे कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होते. आगी लावताना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी लावल्याने आग आटोक्यात आणतांना वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना खूपच मेहनत घ्यावी लागत आहे.
पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर तसेच वीरकडे जाताना पांगारे घाट, काळदरी खोरे आणि त्याच भागातील इतर परिसरात डोंगरांचा प्रदेश जास्त असल्याने या भागात प्रसिद्ध काळी मैना अर्थात करवंदे यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते. दरवर्षी येथील नागरिक, महिला डोंगरात जावून करवंदे तोडतात आणि सासवड तसेच परिसरात विकून चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात. सध्या करवंदाच्या जाळ्या बहरल्या असून फुले जावून करवंदे लागलेली दिसून येतात.
येत्या काही दिवसांत त्यांच्या तोडणीचा हंगाम सुरु होईल; परंतु याच परिसरात मोठ्या प्रमाणात आगी लागून हजारो करवंदाच्या जाळ्या नष्ट झाल्या आहेत, त्यामुळे या भागातील नागरिक हताश झाले आह्रेत. त्याचबरोबर डोंगरातील वर्षानुवर्षे वास्तव्य करणारे ससा, हरीण, काळवीट, कोल्हे, रान डुक्कर, मोर यांची निवासस्थाने नष्ट झाल्याने त्यांच्यावर सैरा वैरा धावण्याची वेळी आली आहे.
गवत जाळल्याने ते पुन्हा चांगले येते हा गैरसमज आहे. वास्तविक गवताच्या बिया मातीत रुजल्या आणि त्यास पावसाचे पाणी मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते. बियाच जळाल्या आणि कितीही पाऊस पडला तरी त्या उगवून येवूच शकणार नाहीत. त्यापेक्षा वनांचे संरक्षण करणे, स्थानिक आपल्या भागातील परिसरात मोकळ्या जागेत विविध जातींची वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करणे, वनसंपदा जतन करण्यासाठी आपल्या पातळीवर नागरिकांना प्रबोधन करणे, याबाबतच्या कायद्याची माहिती देवून जनजागृती करण्याची गरज आहे.





