Pune District : सोपानकाकांचे निंबूतमध्ये भव्य स्वागत

वारकर्यांच्या सेवेसाठी गावकर्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विजय लकडे
सोमेश्वरनगर – संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे बुधवारी (दि. 25) संध्याकाळी 5 वाजता निंबूत (ता. बारामती) येथे आगमन होताच संपूर्ण गावात भक्तीभाव, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मांडकी येथील मुक्काम आणि नीरा येथे दुपारचे भोजन आटोपून पालखीचा बारामती तालुक्यात प्रवेश झाला.
निंबूत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने टाळ-मृदंगाच्या गजरात वाजतगाजत भव्य स्वागत करण्यात आले. बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत वारकर्यांचे स्वागत केले रस्त्याच्या दुतर्फी आकर्षक रांगोळी, स्वागत कमानी आणि पुष्पवृष्टीने वातावरण भारावून गेले होते. स्वागतासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर चे माजी चेअरमन शहाजीराव काकडे, माजी उपसरपंच विजय काकडे, मानद सचिव मदन काकडे, चंद्रशेखर काकडे, अमर काकडे, आणि गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत निंबूत, सतीश भैय्या कल्याणकारी संघ, साहेबराव दादा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकर्यांना चिक्की, केळी, चहा वाटप करण्यात आले. तसेच दिंडीसाठी पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था केली होती. मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली गेली. होळ प्राथमिक आरोग्य केंद्र व निंबूत आरोग्य उपकेंद्राच्या वतीने मोफत औषध वाटप करण्यात आले. सोपानकाका माऊलीच्या भक्तिगजरात टाळ-मृदंगासह वारकरी पुढे सरकत होते. पांढर्या पोशाखात, कपाळावर गंध व गळ्यात तुळशीमाळ घालून, वृद्ध, तरुण, महिला, मुले – सारेजण हरिनामात हरखून गेले होते. गावात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.
पालखी मार्गावर आनंदनगर येथील संगम तरुण मित्र मंडळाने केळी व बिसलरी वाटप केले. तसेच गावातील शाळा, सोसायटी हॉल, समाज मंदिर येथे वारकर्यांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. पालखीचा मुक्काम विठ्ठल मंदिरात असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.
आज सोमेश्वरनगरात मुक्काम
निंबूत मुक्काम आटोपून संत सोपानकाका पालखी सोहळा गुरुवारी (दि. 26) पुढील मुक्कामासाठी सोमेश्वरकडे मार्गस्थ होणार आहे.





