Pune District : अकलूजला रंगणार भव्य ओपन बैलगाडी शर्यत

अकलूज : शंकरनगर-अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ’सहकार महर्षी केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत’ शुक्रवार (दि. 7 फेब्रुवारी) क्रीडा संकुल समोरील पटांगणात होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
सहकार महर्षी काही शंकराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व ट्रस्टी अॅड. नितीन खराडे, तुकाराम जाधव, चंद्रकांत कुंभार, श्रीकांत राऊत, संतोष माने, वसुंधरा देवडीकर, शाहीनाज शेख, नानासाहेब काळे उपस्थित होते.
सहकार महर्षी केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यती 500 पेक्षा अधिक गाड्या सहभागी होतील. शर्यतीत प्रथम पारितोषिक 1.50 लाख रुपये रोख व चषक, द्वितीय 1 लाख 10 हजार, तिसरे 75 हजार, चौथे 60 हजार, पाचवे 50 हजार, सहावे 30 हजार, सातवे 20 हजार, आठवे 10 हजार आणि सेमी फायनलमध्ये दोन नंबर उतरणार्या गाडीस योग्य बक्षीस दिले जाणार आहे. बैलगाडा शर्यत प्रेक्षकांना पाहता यावी यासाठी गॅलरी तसेच महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था 24 तास लाईट पाणी आदींची सोय केली असल्याचेही श्री मोहिते पाटील यांनी सांगितले.
सात फेब्रुवारी रोजी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी आठ वाजता उद्घाटन होईल या यावेळी कारखान्यात चेअरमन जयसिंग मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर तसेच अर्जुनसिंह मोहिते पाटील व बैलगाडी शर्यतीच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.
प्रथम बैलजोडीचा होणार सन्मान
बैलगाडी शर्यती बैलगाडा मालकास रोख रक्कम व चषक दिले जाते; परंतु जिंकून देणार्या बैलांना काहीच दिले जात नाही. या स्पर्धेत प्रथम येणार्या बैल जोडीला मेडल, झूल व महर्षी चषकाचे बाशिंग देऊन बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
ऑनलाइन नोंदणी आवश्यक
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी शनिवार (25 जानेवारी) पासून सुरू झाली असून 6 फेब्रुवारीपर्यंत सकाळी नऊ ते पाच या वेळेत घेतली जाईल. ऑफलाइन नोंदणी घेतली जाणार नाही या स्पर्धेसाठी गट गुरुवार 6 फेब्रुवारी सायंकाळी सात नंतर ऑनलाईन काढले जातील.





