हवेली तालुक्याचे तिसर्यांदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये कभी खुशी कभी गम विंझर – हवेली तालुक्याचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे तिसर्यांदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये कभी खुशी कभी गम, असे वातावरण पाहावयास मिळत आहे. शिवगंगा खोर्यातील काही ग्रामपंचातींना स्थापनेपासून आरक्षणाचा लाभ घेता आला नव्हता; परंतु हवेली तालुक्याच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या तिसर्या सोडतीमध्ये शिवगंगा खोर्यातील काही गावांना अनुसूचित जातीच्या सरपंच पदाच्या जागेसाठी वर्णी लागली आहे तर काही गावांना अनेक वर्षे आरक्षणाची वाट बघून देखील हाती काहीच लागले नसल्याने नाराजीचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांनंतर हाती आलेला तोंडचा घास गेल्याने तर समाज माध्यमांद्वारे इच्छुकांमार्फत नाराजीचे वातावरण पाहावयास मिळत आहे; परंतु या उलट ज्या गावांना आरक्षणाचा लाभ भेटला आहे. त्याठिकाणी तर इच्छुकांनी निवडणुकीसाठी कंबरच कसली आहे. या प्रशासनाच्या आरक्षणाच्या सोडतीबाबत अनुसूचित जातीचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीने केला असून त्याबाबत हवेली तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले आहे; मात्र कार्यवाही न झाल्यास रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. तर दुसर्या बाजूला अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने इच्छुकांनी कंबर कसली असून गाव बैठकांना पॅनलद्वारे तयारी चालू केली आहे. त्यामुळे 2025-30 सालच्या सरपंच पदाच्या निवडुणुकीचे यंदाचे बिगुल काटे की टक्करप्रमाणे जोरदार होण्याची दाट शक्यता दिसत आहे.