– भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना किसान सभेचे निवेदन भोर – शेतकऱ्यांचे प्रश्नांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे, असे साकडे केंद्र सरकार व राज्य सरकारला करणारे निवेदनभोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये भोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवणारे आपले निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे देण्यात आले. या निवेदनात देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी, नवीन शेतमाल विक्रीचे राष्ट्रीय धोरण रद्द करावे, शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम द्यावी, शेतकऱ्यांचे शेती पंपाचे सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, या परिसरातील इंद्रायणी तांदळाला आधारभूत किंमत मिळावी, पावसामुळे झालेल्या शेतजमीन’, घरे यांच्या नुकसानीची भरपाई दिली जावी, शेतकऱ्याला कायमस्वरूपी दरमहा दहा हजार रुपये पेन्शन योजना लागू करावी, ज्या शेतकऱ्यांना घरे नाहीत त्यांना घरे बांधून द्यावीत. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यांना ती त्वरित देण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात ऊहापोह केला आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड विठ्ठल करंजे, संपत टापरे, बबन आखाडे, अभिजीत धोंडे व पांडुरंग नांगरे यांच्या सह्या आहेत.