Pune District: शासकीय कार्यालय की तळीरामांचा अड्डा?

राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून शासकीय कार्यालय की तळीरामांचा अड्डा? अशी परिस्थिती येते दिसून येत आहे. लोकशाहीचे मंदिरात म्हणून ओळखल्या जाणार्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मद्यपान करणार्यांचा सुळसुळाट झाला आहे. पंचायत समितीच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडलेला दिसत असून, गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या कार्यालयाच्या काही फूट अंतरावरच हे चित्र पाहायला मिळत आहे. गट विकास अधिकार्यांच्या कार्यालयाजवळ मद्यपानाचा उघडपणे जल्लोष होत असून प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालय सुटल्यानंतर रात्रीच्या वेळेस समिती परिसरात काही स्थानिक बेधडकपणे मद्यपान करत बसतात. याचे गांभीर्य म्हणजे, ही सर्व प्रकारची बेशिस्त थेट गट विकास अधिकार्याच्या कार्यालयाजवळ घडते, पण अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासन झोपेत की सौम्य हेतूने दुर्लक्ष? करीत आहे हेच समजत नाही अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या आहेत.
शासकीय कार्यालयाच्या आवारात असा प्रकार घडतो आहे, हे अत्यंत लाजिरवाणं आणि निंदनीय आहे. शिस्तबद्ध प्रशासन आणि स्वच्छ कार्यालयीन संस्कृतीची चर्चा करणार्यांना हे दृश्य कितपत शोभेल? या प्रकारामुळे संपूर्ण पंचायत समितीची प्रतिमा मलीन होत असून सामान्य जनतेच्या मनात प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटतो आहे. यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर उद्या याच कार्यालयात कायद्याची पायमल्ली ही खुलेआम होईल.
रात्री मद्यधुंद जल्लोष?
खेड पंचायत समितीमध्ये दिवसा शासकीय कामकाज आणि रात्री मद्यधुंद जल्लोष ? होत आहे. ही परिस्थिती पाहता खेड पंचायत समिती कार्यालय शासकीय कामासाठी ओळखले जाते की, तळीरामांच्या बेधुंद पार्टीसाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.
शासनाचे डोळे कधी उघडणार?
राजगुरुनगर शहरातील काही कार्यालयाजवळील स्वच्छतागृहा जवळ तळीरांचे अड्डे बनले आहेत. याठिकाणी दिवसा आणि रात्रीच्या वेळी तळीराम दारू पित असतात याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. बाटल्यांचा खच पडला असतानाही त्यावर प्रतिबंध करण्याचे शासकीय अधिकार्यांमध्ये धाडस नसल्याने यावरून स्पष्ट होत आहे. बाटल्यांचा खच आणि बेशिस्त यंत्रणा हीच ओळख खेड पंचायत समितीची राहणार का? असा सवाल यानिमित्त उपस्थित झाला आहे.




