वारकर्यांनी घेतला माऊलींच्या पादुकांच्या स्पर्श दर्शनाचा लाभ नीरा – पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झाला. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीकाठच्या नीरा (ता. पुरंदर) शहरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याच आगमन मंगळवारी सकाळी नऊ वाजता झाले. त्यापूर्वी नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना परतीच स्नान घालण्यात आले. माउली माउलीचा गजर करत वरुणराजाच्या उपस्थितीमध्ये माउलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. यानंतर हा पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी नीरा येथील विठ्ठल मंदिरात विसावला. पंढरपूरहून पुन्हा अलंकापुरीकडे निघालेला संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सोमवारी (दि. 14) रात्री सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे विसरला होता. तर मंगळवारी सकाळी नीरा नदी काठावर परतीचे स्नान घालण्यात आले. यानंतर नीरा नगरीमध्ये ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. वारकर्यांना स्पर्श दर्शनाची परंपरा नीरास्नान झाल्यानंतर रथापुढे आणि रथा मागे चालणार्या वारकर्यांना ते उभे असलेल्या ठिकाणी माउलींच्या पादुका नेऊन त्यांना स्पर्श दर्शन देण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी या वारकर्यांना या स्पर्श दर्शनाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे वारकर्यांनी माउलींचा रथ अडवला होता; मात्र यावर्षी कोणताही वाद-विवाद तंटा न होता वारकर्यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकर्यांनी आनंद व्यक्त केला. नीरा नदित पादुकांच्या स्नानानंतर सोहळा मालकांनी प्रथम रथा मागील व नंतर रथा पुढील विणेकर्यांसह पायी चालणार्या वारकर्यांन माउलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन दिले.