Pune District : धामणीत भरदिवसा बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार

लोणी धामणी – धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबा मंदिर परिसरातील पांगुळठिका या भागात जनावरे चरत असताना बुधवार ( दि.१६) रोजी भरदिवसा दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बिबट्याने शिवाजी गाढवे यांच्या शेळीवर हल्ला करून शेळी ठार केल्याची घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीने धामणी वन परिमंडळ विभागाच्या च्या वनपाल नीलम चव्हाण, वनरक्षक अस्मिता शिंदे, दिलीप वाघ, उपसरपंच अक्षयराजे विधाटे, गणेश जाधव, गोविंद वाघ यांनी घटना स्थळी भेट दिली.
या हल्ल्यात १ शेळी मृत्युमुखी पडल्याने गाढवे यांचे जवळपास १२ हजाराचे नुकसान झाले आहे. धामणी परिसरात काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी हिवरकर मळा येथे शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे गोरक्ष हिवरकर यांनी सांगितले.
या परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ, शेतकरी, शालेय विद्यार्थी यांच्यामधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने हिवरकर मळा येथे पिंजरा लावला असून पांगुळठिका परिसरात सुद्धा पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपाल चव्हाण यांनी सांगितले.





