सोमवारपासून बारामतीत उपोषण : सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे डोर्लेवाडी – झारगडवाडी ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे, या गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी गरजेचे आहे. मात्र, गावाला बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडून पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी दिला जात नाही. त्यामुळे गावचा विकास थांबला आहे. झारगडवाडी गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी तात्काळ द्यावा, यासह इतर मागण्या पूर्ण न झाल्यास (दि.१८) पासून बारामती पंचायत समितीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी दिला आहे. यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. झारगडवाडी गावाला सध्या मेखळी गावात असलेले ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांच्याकडे झारगडवाडीचा अतिरिक्त पदभार दिला आहे. मात्र, हे अधिकारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. त्यांना झारगडवाडी गावाला कुठल्या वारी असणार आहे आणि वेळ काय आहे, असा बोर्ड लावण्याची अनेकवेळा मागणी करूनही हे ते जाणीवपूर्वक बोर्ड लावत नाहीत. हे अधिकारी एक ते दोन दिवस येतात. तेही दोन- तीन तास थांबून निघून जातात. त्यामुळे अनेक नागरिकांना वार आणि वेळेची माहिती मिळत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. यावेळी अनेक प्रमुख मागण्या पोटे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा पोटे यांनी दिला आहे. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करू सरपंच अजित बोरकर म्हणाले की, झारगडवाडी गाव मोठे आहे. त्यामुळे या गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे गरजेचे आहे. याबाबत गावच्या वतीने आम्ही बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याशी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी केलेली आहे. सध्या गावाला अतिरिक्त पदावर असलेले ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे हे एक दोन दिवस येतात. तेही दोन-तीन तासच थांबत आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळत नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.