पुणे जिल्हा : शरद पवारांशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबासह घोडगंगाला त्रास

अशोक पवार : पूर्व हवेलीतील गावांमध्ये संवाद दौरा
सोरतापवाडी – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच वर्षांपासून सगळे चुकीचे राजकारण चालले आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या, उलथापालथ झाली, त्या काळात मी निष्ठेने शरद पवार यांना साथ दिली. याचा बदला म्हणून मला, माझ्या कुटुंबाला व माझ्या घोडगंगा कारखान्याला खूप त्रास दिला; परंतु काही झाले, प्रसंगी जीव द्यायची वेळ आली, तरी मी शरद पवार यांना सोडणार नाही म्हणजे नाही, असा निर्धार शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार अशोक पवार यांनी येथे व्यक्त केला.
शिरूर-हवेली विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी पूर्व हवेलीत गावभेट दौर्या निमित्ताने सांगितले. यावेळी सोरतापवाडी, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, म्हातोबाची आळंदी, नायगाव, पेठ इत्यादी गावात गावभेट दौरा केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशोक पवार यांची निवडणूक प्रचारार्थ काही ठिकाणी बैलगाडीमधून तर काही ठिकाणी घोडयावर बसुन मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले. विकासकामात राज्यात अशोक पवार यांचा हात कोणी धरू शकत नाही. लोकांची सेवा करणारा आमदार आहे. राज्यातील शिवसैनिक वाट पाहते होते, ते नक्कीच विरोधकांना त्यांची जागा दाखवतील.
सर्व शिवसैनिक अशोक पवारांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असून शिरूर-हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा राहणार आहे.हवेली तालुक्यात आमदार अशोक पवार यांना जास्त मतदान कसे होईल याकडे शिवसेना जातीने लक्ष देणार असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर हवेली संघटक स्वप्नील कुंजीर यांनी सांगितले.
यावेळी आमदार अशोक पवार यांनी सांगितले की अस्तरीकरण झाले तर येथील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी मिळणार नाही तसेच विहीरी व बोअरला पर्क्युलेशन होणार नाही त्यामुळे कॅनॉलवर अस्तरीकरण कदापि होऊ देणार नाही.
मला दम दिला की कसा आमदार होतो तेच बघतो. मला आमदार करायचे त्यांच्या हातात नसून जनतेच्या हातात आहे. लोकसभेला सुद्धा खासदार कोल्हे व लंकेला दम दिला की कसा खासदार होतो ते बघतो. पण जनतेने त्यांना भरभरून मतदानरुपी प्रेम दिले तसेच प्रेम मला ही जनता येणार्या 20 तारखेला देणार आहे.
-अशोक पवार, महाविकास आघाडीचे उमेदवार.





