– राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचे आवाहन पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नेत्यांनी मनापासून माझे काम केले. विरोधकांचा जरी विजय झाला असला तरी लोकांच्या मनातील आमदार मीच आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा कार्यअध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले. नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग खंडोबा देवस्थान येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात देवदत्त निकम बोलत होते. यावेळी बाळासाहेब बाणखिले, धोंडिभाऊ भोर, राजाराम बाणखिले, अरुणा घोडे, नंदू बोऱ्हाडे, प्रभाकर बांगर, गणपत वळसे, विजय कासार, दिलीप पवळे, माऊली ढोमे, बबनराव पोकळे, शरद बोंबे,श्वेता ढोबळे, गणेश यादव यांनी सूत्रसंचालन केले. देवदत्त निकम म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत सर्व सामान्य गरिब व शेतकऱ्यांनी मला भरघोस मतदान केले. आपला विजय थोड्या मतांनी हुकला. मी आमदार झालो नाही यांची सल माझ्या मनात आहे. तसेच आदिवासी हिरडा प्रकल्प व त्यांची पाणी समस्या व सातगाव पठार आणि लोणी धामणी भागातील शेतीच्या पाणी देण्यासंदर्भात मी रस्त्यावर उतरून आवाज उठवणार आहे. तसेच भीमाशंकर साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शिरूर तालुक्यातील शेतकरी व सतत ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना भिमाशंकर सहकारी कारखान्याने सभासद करून घेण्यासाठी मी प्रयत्न करित राहणार तसेच शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यास कारखान्याने विरोध केला तर मी कारखान्याच्या अधिकारी व संचालकांना कारखान्याच्या गेटमधून आत जाऊन देणार नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडीसाठी तयारीला लागा, असे देवदत्त निकम यांनी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपण ईव्हीएम मशीनमुळे हरलो आहे. आपण प्रचाराच्या वेळी गावोगावी फिरत होतो.त्यावेळी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रचारामध्ये सहभागी होत होते. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील महाविकास आघाडी एकसंघ राहून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाणार आहे. – सुरेश भोर, शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) विरोधी पक्षाने नागरिकांना अनेक आमिषे दाखवली. परंतू शेतकरी व गरिब जनता शेतकरी पूत्र देवदत्त निकम यांच्या पाठीशी उभी राहिली.आम्ही खचून न जाता शरद पवार यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहणार आहोत. – शेखर पाचुंदकर, कार्याध्यक्ष, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).