Pune District : रांजणगाव परिसरातील विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावा

उपमुख्यमंत्री अजित पवार; मुंबई मंत्रालयातील बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश
रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी आणि हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई येथे झालेल्या एका बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. दररोज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याव्यतिरिक्त, गावाजवळ एमआयडीसी असल्यामुळे कामगारांची व स्थलांतरित लोकसंख्येची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक असल्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीत रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी आणि हिवरे या गावांच्या प्रतिनिधींनी रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी पायाभूत प्रश्न मांडले. या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. कारेगाव आणि ढोकसांगवी परिसरात वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय साधून काम करावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
या बैठकीला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) डॉ. के. एच. गोविंदराज याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, एमआयडीसीचे सह-व्यवस्थापक कुणाल खेमनार, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार,
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे पाटील, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, माजी पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप, कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील, प्रा.माणिक खेडकर, रांजणगाव गणपतीचे माजी सरपंच सर्जेराव खेडकर, कारेगावचे माजी उपसरपंच संदीप नवले, रांजणगाव गणपतीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल दुंडे, युवा उद्योजक शुभम नवले, प्रताप फंड, संदीप गवारे, दिपक खैरे यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





