पुणे जिल्हा : तळेगाव ढमढेरेत गॅसवाहिनीला आग

सुदैवाने कोणतीही हानी नाही; मात्र परिसरातील नागरिक भयभीत
शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथून नागरिकांच्या शेतातून गेलेल्या टोरेंट कंपनीच्या खासगी गॅस पाइपलाइनला आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून शेतकर्याचे नुकसान झाले आहे. घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा येथे आनंदग्राम सोसायटी लगत बाळासाहेब भुजबळ व एकनाथ भुजबळ यांच्या घराच्या शेजारी संतोष नरके यांच्या शेतातून केलेल्या टोरेंट कंपनीच्या खासगी गॅस पाइपलाइनला आज दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली आणि आगीचे लोळ हवेत पसरू लागल्याने नागरिक भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, अमोल नलगे, विकास मोरे, उद्धव भालेराव, पोलीस पाटील पांडुरंग नरके, अनिल भुजबळ, सागर नरके,
सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा दरेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती टोरेंट कंपनीच्या अधिकार्यांना दिली. कंपनीच्या अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाईपचे कॉक बंद करत आग विझवली. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही मात्र संतोष नरके या शेतकर्याच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. कंपनीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
तळेगाव ढमढेरे येथे टोरेंट कंपनीच्या गॅस पाइपलाइन उघड्या पडल्या असून घुशींनी बिळे केली असल्याने धोका होऊ शकतो. याबाबतच्या तक्रारी मी स्वतः टोरेंट कंपनीच्या कार्यालयात जाऊन केल्या होत्या; मात्र त्यांनी लक्ष दिले नाही.
-संतोष नरके, स्थानिक शेतकरी
आग लागलेल्या ठिकाणची पाहणी केली असून आगीचे कारण लगेच सांगू शकत नाही. तसेच शेतकर्याशी बोलणे झाले असून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-सतीश पटेल, व्यवस्थापक टोरेंट कंपनी





