जेजुरी : सालाबाद प्रमाणे जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात रविवारी (दि. 12) शाकंबरी उत्सव साजरा करण्यात आला. समस्त पुजारी सेवेकरी यांनी विविध फळभाज्या, पालेभाज्यांची आरास करीत मुख्य गाभारा सजवला होता. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये श्री खंडोबा सोबत म्हाळसाई आणि बाणाई असल्याने या मंदिरामध्येही शाकंभरी उत्सव साजरा केला गेला. त्यानिमित्त मंदिराच्या गाभार्यात कांदा, गाजर, वांगे, भोपळा, दोडका, बीट आदी फळभाज्या आणि विविध पालेभाज्यांची आरास करण्यात आली होती. पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती तेव्हा त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकांबरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या. ही आरास नित्य वारकरी, पुजारी वर्ग, कर्मचारी सेवकरी वर्ग यांनी केली होती.