Pune District : डीजे नाही, गुलाल नाही तरीही उत्साहाचा जल्लोष !

लोणी काळभोर – -गणेश विसर्जन मिरवणुकीचा विचार आला की डीजेचा दणदणाट, बेसुमार गुलालफेक, गोंधळ आणि काही ठिकाणी अराजकतेचे चित्र डोळ्यांसमोर येते; मात्र लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा या रूढ समजुतींना छेद देत राज्यात आदर्श ठरली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून ते अंमलदारांपर्यंत सर्वांनी एकच पारंपरिक ड्रेसकोड परिधान केला होता. गुलालाऐवजी फुलांची उधळण झाली. डीजेऐवजी ढोल-ताशा, लेझीम, मृदंग, टाळ या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पार पडली. पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचार्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देत ‘आदर्श विसर्जन’ कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला.
मिरवणुकीला सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यात गणरायाची आरती करून सुरुवात झाली. मार्गक्रमणात दत्तमंदिर, गणपती मंदिर, ग्रामपंचायत, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बाजार मैदान अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश होता.
बाजार मैदानातील कृत्रिम हौदात महिलांच्या हस्ते गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आले. यावेळी सुरताल व बाबा नाशिक ढोल-ताशा पथकांचा जल्लोष, कन्या शाळेतील मुलींची लेझीम, महिला पोलीस कर्मचार्यांची फुगडी, वारकरी शिक्षण संस्थेच्या हरिपाठाचे सूर यामुळे वातावरण भारावून गेले. पोलिसांच्या बँड मास्टर पथकानेही उपस्थितांची मने जिंकली.
या मिरवणुकीत सर्व अधिकारी-अंमलदार एकाच वेशभूषेत दिसल्याने ‘समतेचा’ संदेश समाजाला मिळाला. पुरुषांनी फेटा, कुर्ता, पायजमा तर महिलांनी पारंपरिक साड्या परिधान केल्या होत्या. गणरायासमोर सगळे सारखेच कोणी उच्च नाही, कोणी कनिष्ठ नाही हा संदेश पोलिसांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
लोणी काळभोर गावकर्यांनी या शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक मिरवणुकीचे कौतुक केले. एरवी मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट, बेसुमार गुलाल, दारूचा तमाशा मात्र लोणी काळभोर पोलिसांनी या सर्व प्रकारांना फाटा देऊन आदर्श घालून दिला आहे. ही मिरवणूक राज्यातील सर्व मंडळांसाठी आदर्श ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.





